संगमेश्वरजवळ आरवली घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली घाटात 29 मे 2025 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. चुकीच्या बाजूने आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/451 अनिकेत अविनाश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 83/2025 अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 106(1), 281, 125 (अ) (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दुचाकीस्वार निलेश सीताराम जाधव (वय 31) हा आपली मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 08 टी.सी. 147) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना, चुकीच्या लेनमधुन (राँग साईडने) चालवत होता. आरवली घाटातील वळणाचा आणि चढ-उताराचा रस्ता असताना, निलेश जाधवने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, बेदरकारपणे दुचाकी चालवली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच. 48 डी.सी. 9439) ला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार निलेश जाधव याला गंभीर दुखापती झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताला निलेश जाधव याची हयगय आणि बेदरकारपणे वाहन चालवणे कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 02-06-2025