रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत पर्यटनपूरक व्यवसाय

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमइजीपी) योजनेचा दुहेरी फायदा आणि मोठ्या संधी मिळणार आहेत. या योजनेत क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय यांसारख्या अनेक नवीन पर्यटनपूरक आणि सेवा उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमइजीपी) हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. जिल्ह्यातील युवकांना व युवतींना यशस्वी उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी या योजनेद्वारे मिळते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबविण्यासंदर्भातील सुधारित तरतुदी १ एप्रिल २०२५ पासून लागू आहेत.

त्यात सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, खाद्यान्न केंद्र तसेच कुक्कुट पालन, अंडी उबवणी केंद्र, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल, ढाबा शाकाहारी व मांसाहारी पदार्थ विक्री व्यवसाय, जलक्रीडा, मासेमारी, बोट व्यवसाय योजनेंतर्गत पात्र असतील.

लाभाची रक्कम अशी असेल
सेवा उद्योगासाठी प्रकल्प किंमत ५० लाख रुपये व उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपये करण्यात आली आहे. प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण सेवा उद्योगांसाठी खेळते भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के व उत्पादन उद्योगांसाठी खेळते भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 02/Jun/2025