अमरावती : एमपीएससी गट ‘क’ संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये शहरातील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय या परीक्षा उपकेंद्रावर गैरप्रकार झाल्याचा प्रकार घडला. येथे परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्यांकडे हेडफोन आढळून आला आहे.
परीक्षा सुरु झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी आपल्याकडे चुकून हेडफोन राहिल्याचे विद्यार्थ्यानेच पर्यवेक्षकांना सांगत ते जमा केले. परंतु परीक्षा हॉलमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक गॅजेट किंवा मोबाइल नेण्यास बंदी असतानाही विद्यार्थ्याने हेडफोन नेल्याचा ठपका ठेवत या विद्यार्थ्यांवर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ‘गट क’ संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन रविवार दि. १ जून रोजी करण्यात आले होते. शहरातील ३४ उपकेंद्रावर या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या केंद्रावर तब्बल १० हजार ३७८ परीक्षार्थी परीक्षेसाठी पात्र होते. सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ही परीक्षा पार पडली. यावेळी प्रत्यक्षात ७ हजार ७२३ विद्यार्थी हे परीक्षेला हजर होते. तर २ हजार ६५५ विद्यार्थी हे विविध कारणांनी परीक्षेला गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी तब्बल १ हजार १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु यानंतरही शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे हेडफोन आढळल्याने त्यावर एमपीएससीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 02-06-2025














