CM Devendra Fadnavis: राजकारणात संख्या महत्त्वाची असते. या विषयावर नेहमीच चर्चाही होते. परंतु दुधात साखर टाकली की दूध जसे गोड होते, तोच गोडवा निर्माण करणारे कार्य चित्तपावन ब्राह्मण समाजाने केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजतागायत प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मण समाजाने उन्नती साधली आहे. हाच इतिहास नवीन पिढीने कायम ठेवावा, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे चित्तपावन ब्राह्मण संघाने उभारलेल्या ‘श्री परशुराम भवन’ या नूतन वास्तूच्या लोकार्पणावेळी केले. यावेळी पंतप्रधान मोदींचा ‘एक है तो सेफ है’ हा नारा बुलंद करा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“महाराष्ट्राच्या व भारताच्या संपूर्ण इतिहासात समाजाच्या सर्वच क्षेत्रात चित्पावन ब्राह्मण समाजातील लोक अग्रणी असल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य वाढवण्यापासून ते भारतीय स्वातंत्र्यलढा, समाजातील सुधारणावादी क्षेत्र, कला व साहित्य क्षेत्रातील पहिल्या १० नावांमध्ये किमान ३ ते ४ चित्पावन ब्राह्मण समाजातील सापडतात. अतिशय बुद्धिमान व मेहनती असलेल्या चित्पावन ब्राह्मण समाजातील अनेक लोक अतिशय विषम परिस्थितीतून, सामान्य, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातून स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले पाहतो,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“समाजात जातीव्यवस्था असू नये, असे म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असे म्हटले तर चांगले होईल. ही विषमता दूर करणे सर्वांची जबाबदारी आहे. ब्राह्मण समाजाची लोकसंख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचे म्हटले जाते. पण ब्राह्मण समाज दूधात साखरेप्रमाणे असून चिमूटभर साखरेमुळे दूध गोड लागते. त्याप्रमाणे समाजात गोडवा निर्माण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. समाजाला उपयुक्त अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. समाजाच्या व देशाच्या विकासात चित्पावन ब्राह्मण समाजाचे ऐतिहासिक योगदान राहिले असून तशीच पुढची पिढी निर्माण होईल, असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
“चित्पावन ब्राह्मण समाजातील लोकांनी ऐतिहासिक काळापासून केवळ स्वतःचा विचार केला नाही, तर समाजाच्या विविध क्षेत्रात सर्वांना उपयुक्त ठरतील अशा गोष्टी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ हा मंत्र दिला असून त्याचा अर्थ आपण सर्वच सनातन विचार मानणारे आहोत. म्हणूनच आपण केवळ जातीचा, पंथाचा विचार न करता एकत्वाची भावना मनात असणे गरजेचे आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 02-06-2025














