राजापूर रोड स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड येथे जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी तत्कालीन आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

राजापूर रोड या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याअनुषंगाने मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांचा राजापूर रोड स्थानकावर थांबा निश्चित करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे. तसेच या स्थानकासाठी आरक्षणाचा कोटा वाढवावा, अशीही मागणी होत आहे.

याबाबत पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांच्यातर्फे तत्कालीन आमदार सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे गाड्यांचा राजापूर रोड स्थानकावर थांबा सुरू करण्याबाबत शिफारस केली आहे. तसेच आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस व नेत्रावती एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा मंजूर होण्याकरिता पुढील केंद्रीय स्तरावर रेल्वे विभागाशी पंचक्रोशी ग्रामविकास समिती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 02/Jun/2025