खेडच्या टंचाईग्रस्त गावात धावल्या टँकरच्या ८३ फेऱ्या

खेड : तालुक्यात गेल्या आठवडाभर कोसळलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे जलस्रोत उपलब्ध झाल्याने तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये धावणाऱ्या टँकरला ब्रेक लागला आहे. ३ एप्रिलपासून १६ गावातील १९ वाड्यांमध्ये केवळ एका शासकीय टँकरच्या ८३ फेऱ्या धावल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येसह फेऱ्यांचीही संख्या घटल्याने पंचायत समितीच्या पाणी विभागाला दिलासा मिळाला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनांसह विहिरींच्या खोदाईमुळे वर्षानुवर्षे टंचाई आराखड्यात असणाऱ्या गाव-वाड्या टँकरमुक्त झाल्या.

टंचाई कृती आराखड्यात १९ गावातील ४४ वाड्यांची नोंद करण्यात आली होती. यातील सर्वच गाव-वाड्यांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नसल्याची बाब समोर आली आहे. तालुक्यात ३ एप्रिलपासून घेरारसाळगड-बुधराईवाडी येथे पाण्याचा पहिला टँकर धावला. घेरारसाळगडसह खवटी, चिरणी, गुणदे, सवेणी, केळणे, कुळवंडी, कळंबणी बुद्रुक, तिसंगी, मांडवे, हुंबरी, तळे येथील वाड्यांना एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मुसळधार पाऊस पडण्यापूर्वी तहानलेल्या गाव-वाड्यांमध्ये एका शासकीय टँकरच्या ८३ फेऱ्या धावल्या. घेरारसाळगड बुचराईवाडी व खवटी-खालची धनगरवाडी येथे घावल्या. दोन्ही गाव-वाड्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १६ फेऱ्या धावल्या.

सद्यस्थितीत टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. उष्म्याचा पुन्हा कहर सुरू झाला आहे. यामुळे टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील पाणीपुरवठा बंद झाला असला तरी उष्मा कायम राहिल्यास पुन्हा टँकरने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये झालेली घट तहानलेल्या गाव-वाड्यांतील ग्रामस्थांसह प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 02/Jun/2025