Ladki Bhain Yojna: “लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून…”; अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ना दिलेल्या पैशाबाबत अजित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar on Ladki Bhain Yojna: महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आलं.

हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झालं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांची प्रकरणे समोर आल्यानंतर अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं.

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत २ हजार ६५२ महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे घेतल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. विरोधकांनीही हा मुद्दा उचलत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजना सुरू करताना निकष तपासले न गेल्यामुळे सरकारी नोकरी असलेले, गाडी असलेले तसेच अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. तक्रारी आल्यानंतर तपासणी केला असता अनेक महिलांकडून चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे उघड झालं. आता अर्थमंत्री अजित पवार यांनीही या योजनेत चुका झाल्याचे म्हणाले आहेत. ते पुण्यातील सिंचननगरमध्ये बोलत होते.

“ज्या वेळी आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार कमी काळ होता. दोन तीन महिन्यात लगेच निवडणुका लागणार होत्या. त्यावेळी या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा होता तेवढा मिळाला नाही. तरी आम्ही आवाहन केलं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की जे या योजनेमध्ये बसत नाही ते अर्ज करणार नाहीत. तरीही काहींनी अर्ज केले. त्यामुळे आता दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्न येत नाही,” असं अजित पवार म्हणाले.

अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई नाही

यावेळी पत्रकारांनी अपात्र ठरलेल्या लाडक्या बहि‍णींवर कारवाई केली जाणार का असा सवाल केला. त्यावर अजित पवार यांनी कशाला असं म्हटलं. “जसं जसं आपण शोधतो आहेत तशी प्रकरणे समोर येत आहेत. आता त्यांच्यावर कारवाई कशाला. मान्य आहे चूक झाली, त्यांनी अर्ज करायला नको होते,” असंही अजित पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 02-06-2025