रत्नागिरी, [०२ जून, २०२५]: रत्नागिरी तालुक्यातील तारवेवाडी, साईनगर, हातखंबा येथील एका बंद चिऱ्याच्या खाणीत बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रसाद शंकर आंबेकर (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून, तो २९ मे रोजी दुपारी २ वाजल्यापासून बेपत्ता होता.
प्रसाद आंबेकर हा २९ मे रोजी दुपारी २ वाजता घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी आणि मित्रांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १ जून रोजी पहाटे १२:१८ वाजता बेपत्ता असल्याची नोंद (रजि. नं. ०८/२०२५) करण्यात आली होती.
आज, १ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रसादचा भाऊ त्याला शोधण्यासाठी पाली येथे गेला असताना, त्याला गावातील पोलीस पाटील सचिन सावंत यांनी फोन करून तारवेवाडी साईनगर, हातखंबा येथील सचिन बोंबले यांच्या बंद चिऱ्याच्या खाणीतील पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच प्रसादचा भाऊ तात्काळ हातखंबा तारवेवाडी येथील खाणीजवळ पोहोचला.
खाणीत पाहिले असता, पाण्यात तरंगणारा मृतदेह प्रसादचाच असल्याचे त्याने ओळखले. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात १ जून रोजी सायंकाळी ४:२० वाजता आमृ. क्रमांक १९४ प्रमाणे ४३/२०२५ बी.एन.एस.एस नुसार करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 02-06-2025














