रत्नागिरीत धक्कादायक घटना: सोमेश्वर तलावात पोहताना १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सोमेश्वर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (०२ जून २०२५) दुपारी घडली. आदेश दत्ताराम घडशी (वय १७, रा. देवरुख, खालचीवाडी, ता.जि. रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने देवरुख आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदेश घडशी हा आपल्या काही मित्रांसोबत सोमेश्वर येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास, आदेशने आपल्या मित्रांना ‘मी तलावाची खोली किती आहे ते पाहतो’ असे सांगितले आणि तो पाण्यात खाली उतरला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो पाण्याच्या वर आला नाही.

आदेश पाण्यातून बाहेर येत नसल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून गावातील नागरिक तात्काळ मदतीला धावले. स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम राबवून आदेशला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर आदेशला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४४/२०२५ अन्वये, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे.

एका तरुणाचा अशाप्रकारे अकाली मृत्यू झाल्याने घडशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तलावात पोहताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 02-06-2025