खेड : शिर्शी येथे विहीर कोसळली

खेड : नुकत्याच झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शिर्शी गावावर दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाच्या २००९-२०१० साली उभारलेल्या नळपाणी योजनेतील विहीर अचानक कोसळल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून ८० हून अधिक कुटुंबांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

चिंचवाडी, चिनकटेवाडी, माळीवाडी, गुरववाडी या वाड्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पाणी उपसा यंत्रणा निष्क्रीय झाल्यामुळे आणि पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी वाहून आणण्याची वेळ आली आहे. यामुळे विशेषतः महिलांवर आणि वृद्धांवर प्रचंड ताण पडत आहे.

दरम्यान, गावातील देऊळमाळ येथे असलेले प्राचीन तळेही मुसळधार पावसामुळे ढासळून गेले आहे. हे तळे गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाशी निगडीत असून, येथे अनेक वर्षांपासून धार्मिक विधी, उत्सव आणि स्नानांचे आयोजन होत असत. या तळ्याच्या पडझडीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने गावात या घटनेमुळे पाण्याची समस्या आणखी गंभीर बनण्याची शक्यता असल्याने तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 03/Jun/2025