रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आडीवरे, नवेदर येथील एका घरातून सुमारे ७२,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ०४ मे २०२५ रोजी रात्री ९.०० वाजल्यापासून ते ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या दरम्यान घडली असून, अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आपले अंदाजे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र एका बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स आपल्या पर्समध्ये ठेवला होता. त्यानंतर ही पर्स घरातील लाकडी कपाटात सुरक्षित ठेवली होती. मात्र, जेव्हा फिर्यादीने कपाटातील पर्स बाहेर काढून त्यातील मंगळसूत्राचा बॉक्स पाहिला, तेव्हा तो हलका लागला. त्यांनी बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले.
अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने हे मंगळसूत्र चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीला गेलेल्या मंगळसूत्राचे वर्णन असे आहे: सुमारे तीन तोळे वजनाचे, दोन सोन्याच्या आणि काळ्या मण्यांच्या सरी असलेले, मध्ये सोन्याची चेन असलेले आणि खालील बाजूस सोन्याचे पेंडल असलेले जुने वापरते मंगळसूत्र.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 03-06-2025














