रत्नागिरी, [०२ जून २०२५]: रत्नागिरी जिल्ह्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बजावत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक ०१ जून २०२५ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
डॉ. शामसुंदर अनंत मोरे (वय ४३), वैद्यकीय अधिकारी, चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास ते चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी सुशांत प्रकाश कांबळे (वय २३, रा. गवाणे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) या व्यक्तीने रुग्णालयात येऊन “स्ट्रेचर कुठे आहे, ऑक्सिजन सिलेंडर कुठे आहे, इथे पोलीस कुठे आहेत” असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
आरोपी सुशांत कांबळे याने डॉ. मोरे यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. तसेच, रुग्णालयातील कर्मचारी पांडुरंग गोविलकर, इतर रुग्ण आणि फिर्यादी डॉ. मोरे यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर डॉ. मोरे दुसऱ्या रुग्णाची तपासणी करत असताना आरोपी सुशांत कांबळेने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात हाताने मारले आणि त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखले.
या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १३२, १२१(१), ११५(२), ३५२ आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थेस हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम २०१० चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 03-06-2025














