गुहागरमध्ये ‘बनावट IAS’ चा धुमाकूळ! लष्कराचे बनावट ओळखपत्र वापरून नागरिकांना धमकावले

गुहागर, [०३ जून २०२५]: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात एका २५ वर्षीय तरुणाने स्वतःला भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी भासवून नागरिकांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचे (थलसेना) बनावट ओळखपत्र वापरले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामिनी सुमीत नाटेकर (वय ३४, पोलीस नाईक, गुहागर पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रथमेश शांताराम येवले (वय २५, रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. अनंत नंदनवन पार्क, जानवळे, ता. गुहागर) याने दिनांक १७ मे २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून ते आजतागायत अनंत नंदनवन पार्क, जानवळे येथील रहिवासी श्री. अनिल बापु रहाटे, रामगोंडा भिमराव संकपाळ आणि इतर काही रहिवाशांना आपण ‘IAS’ अधिकारी असल्याचे भासवले.

एवढेच नाही, तर प्रथमेश येवले याने आपल्याकडे भारत सरकार रक्षा मंत्रालय (थलसेना) यांचे ‘AIDS’ या पदाचे बनावट ओळखपत्र तयार करून ते दाखवत या रहिवाशांना शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. यामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गुहागर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २०४ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ३३६(२) (इतरांच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृती) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 03-06-2025