दापोली : दापोली तालुक्यातील करजगाव, तामसतीर्थ बुरोंडी या नदीवर जवळपास पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला कॉजवे वाहून गेला आहे. तर या कॉजवेची सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग दापोली या विभागात नोंद नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या बांधलेल्या कॉजवेचे परीक्षण केले कुणी, असा सवाल या निमित्ताने समोर येत आहे.
करजगाव, तामसतीर्थ आणि बुरोंडी या दोन गावाच्या मधून वाहणाऱ्या नदीमुळे दोन्ही गावात ये जा करण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी लोकांची होती. असे असताना या नदीवर कॉजवे बांधण्यात आला. मात्र, तोही चार-दोन पावसाळ्यात वाहून गेला आहे. या कॉजवेवर बुरोंडी गावातून जाण्यासाठी मार्ग आहे. मात्र, पुढे मुकादम वाडीतून करजगावात जाण्यासाठी मार्गच दिसत नाही.
त्यामुळे हा कॉजवे नेमका कुणी आणि कुणाच्या फायद्यासाठी बांधला, असा सवालदेखील उपस्थित होत आहे.
बुरोंडी राणेवाडी नजीक किन्हळ, देवके करजगाव या नद्यांच्या संगम होतो. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठा असतो. अशावेळी पाण्याच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा या कॉजवेच्या नाल्यात अडकून बुरोंडी मुख्य मार्गावर पाणी येते. तर पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक थांबते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे येथील धार्मिक स्थळांना धोका निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होते.
त्यामुळे हा कॉजवे निर्लेखीत करून या ठिकाणी पूल व्हावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. मात्र या कॉजवेची नोंद जिल्हा परिषदेकडे तसेच बांधकाम विभागात नसल्याने दोन्ही बांधकाम विभागात एक प्रकारे पेच निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 03/Jun/2025














