रत्नागिरी : सांडेलावगण-तवसाळ पुलाला हिरवा कंदील

रत्नागिरी : कोकणच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या सागरी महामार्गासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रविवारी (ता. १) घेतलेल्या बैठकीत मार्ग मोकळा केला. तालुक्यातील सांडेलावगण ते तवसाळ असा सुमारे साडेसात कोटींचा पूल होणार आहे. त्यासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. या जमिनीला योग्य भाव देण्यासह स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिल्यानंतर स्थानिकांनी जमीन देण्यास हिरवा कंदील दिला आहे.

जिल्ह्याच्या किनाऱ्यावरून सागरी महामार्ग जाणार आहे. युद्धपातळीवर या मार्गाचे काम सुरू झाले आहे. अनेक खाडीपुलांचा यामध्ये समावेश आहे. त्यापैकी सांडेलावगण ते तवसाळ पुलाचा समावेश आहे. या पुलाच्या उभारण्यासाठी सांडेलावणग येथील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली होती; परंतु स्थानिकांना या भूसंपादनाचा काय लाभ होणार, याची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांचे अनेक प्रश्न होते. त्याला समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे साडेसात कोटींच्या पुराचे काम रखडले होते.

उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी बैठक घेतली. बैठकीला स्थानिक ग्रामस्थांसह भाजपचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे उपस्थित होते. संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी होती. काहींच्या एकूण जागेपैकी निम्मीच जागा जात होती, तर काहींच्या घराजवळून पूल जात आहे.

या सर्वांच्या प्रश्नांना सामंतबंधूंनी समाधानकारक उत्तरे दिली तसेच चांगला मोबदला देण्याचे आश्वासन दिले. प्रांताधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य सूचना दिल्या. सांडेलावगण येथील ग्रामस्थांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी या पुलासाठी जागा देण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 03/Jun/2025