चिपळूण : शहरासाठी सुरू असलेली ग्रॅव्हिटीची पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या नळाला मीटर बसवले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याचा जेवढा वापर तेवढी पाणीपट्टी नागरिकांना भरावी लागणार आहे.
चिपळूण शहरासाठी १५२ कोटींची पाणीयोजना सध्या सुरू आहे. कोळकेवाडी धरणातील पाणी थेट ग्रॅव्हिटीने चिपळूण शहरात आणले जाणार आहे. ही योजना यशस्वी झाली तर पालिकेला शून्य वीजबिल भरावे लागेल; मात्र धरणातून पाणी उचलताना जलसंपदा विभागाला कर भरावा लागेल. त्यासाठी किती पाणीपट्टी आकारली जाणार हे त्या वेळी ठरणार आहे.
सध्या पालिका शहरातील हजारो नळकनेक्शन धारकांना दिवसातून दोनवेळा पाण्याचा पुरवठा करते. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी पद्धतीने व टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जाते; मात्र वर्षाला पाणीपट्टीतून १ कोटी १० लाख रुपये अपेक्षित असताना ९० लाख रुपये इतकीच वसुली होते. वर्षाला योजनेचे वीजबिल ३ कोटी ५० लाख रुपये, जलसंपदा विभागाला वाशिष्ठीतून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापोटी ४० लाख रुपये, योजनेसाठी ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या ५० कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी ८० लाख रुपये व अन्य दुरुस्त्या, ब्लिचिंग पावडर, तुरटी आदी साहित्य खरेदी असा विचार करता सुमारे ५ कोटी रुपये इतका खर्च येतो.
इतकी वर्षे यातील काही खर्च १५ वा वित्त आयोग, पालिका नफा फंडातून भागवला जात आहे. काही ठिकाणी पाण्याची गळती आणि अनधिकृत कनेक्शन आहेत. घरगुती कारणासाठी घेतलेले कनेक्शन व्यावसायिक कारणासाठी वापरले जात आहे. त्यामुळे पाणीयोजना तोट्यात आहे. शहराच्या काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यावर तातडीने उपायोजना करताना मॅव्हिटीच्या योजनेतील टाक्या लवकरात लवकर पूर्ण करून त्या वापरात आणण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले होते; मात्र मध्यंतरी नागरिकांच्या तक्रारींमुळे दोन महिने टाक्यांचे काम थांबले. नागरिकांनी स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली. स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला. त्यानंतर टाक्यांचे काम सुरू झाले आहे. १५२ कोटीची योजना पूर्ण करताना त्यासाठी लागणारा निधी उभा करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
चिपळूण शहरातील नागरिकांची पाणीपट्टी वाढवण्याबाबत अजून विचार नाही. नवीन योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल; मात्र पाणी वाया जाऊ नये यासाठी नळांना मीटर बसवले जाणार आहे. त्या वेळी किती पाणीपट्टी वसूल करायची ते सभागृहात ठरेल. सध्या आम्ही इतर शहरात किती पाणीपट्टी लागू आहे, त्याचा अंदाज घेऊन परीक्षण सुरू आहे- सतीश खाडे, पाणीपुरवठा प्रमुख, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 03/Jun/2025














