अनधिकृत फलक रत्नागिरी पालिकेने हटवले

रत्नागिरी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहराचे विद्रुपीकरण करणारे सर्व अनधिकृत फलक हटवण्याचे आदेश आहेत. त्याची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुन्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी सूचना दिल्यानंतर रत्नागिरी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील ३५ अनधिकृत बॅनर हटवण्यात आले आहेत. उर्वरित बॅनर दोन दिवसांमध्ये हटवा, अशा नोटिसा २४ जणांना बजावल्या आहेत. पालिका प्रशासनाने ही माहिती दिली.

शहरांचा चांगल्या पद्धतीने विकास होत असताना कोणत्याही कार्यक्रमाचे औचित्य साधून भलेमोठे बॅनर उभारण्याचा ट्रेंड आहे. शहरांचे प्रवेशद्वारे, मध्यवर्ती ठिकाणे, सर्कल, चौक आदी ठिकाणी सर्वत्र मोठे बॅनर, पोस्टर दिसत आहेत.

या बॅनरमुळे शहरांचे सौंदर्य झाकोळून विद्रुपीकरण होताना दिसत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत कडक धोरण घेतले आहे. शहरामध्ये कोट्यवधीची विकासकामे होत आहेत. येणाऱ्या पर्यटकांनी फक्त बॅनरच पाहायचे का, असा प्रश्न उपस्थित करत तत्काळ सर्व अनधिकृत व अनावश्यक बॅनर हटवण्याच्या सूचना सर्व पालिकांना दिल्या. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी पालिकेने सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ अनधिकृत बॅनर हटवण्यात आले आहेत. अनावश्यक ८ बॅनर हटवले तर पुढील दोन दिवसांमध्ये तत्काळ बॅनर हटवा अन्यथा फाउंडेशनसह बॅनर हटवण्यात येतील, अशा नोटिसा २४ जणांना पालिकेने बजावल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 03/Jun/2025