राजापूर : समाजामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम केवळ पोलिसांचे नसून आपणा सर्वांचे आहे. पोलिस आणि जनतेमध्ये सुसंवाद असेल तर समाजात घडणाऱ्या अघटित घटनांना आळा बसतो. त्यामुळे पोलिस आणि जनतेने एकोप्याने काम करून रत्नागिरी जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करूया, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी राजापूर येथे केले. पोलिस व जनतेमधील सलोखा राखण्याचे काम सामाजिक सलोखा समितीमार्फत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजापूर येथे झालेल्या सामाजिक सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, बौद्धजन संघाचे पदाधिकारी महादेव गोठणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर, अॅड. शशिकांत सुतार, राजापूर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बगाडे म्हणाले, ‘जनतेमध्ये उतरून काम करण्याचे ध्येय ठेवून मी या सेवेत आलो आहे. त्यामुळे यापुढेही मी नेहमी जनतेच्या संपर्कात राहणार आहे. आपल्या तालुक्याचे नाव मोठे करायचे की, बदनाम करायचे हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे आपल्या गाव, तालुक्याचे नाव मोठे होईल, अशी कामगिरी सर्वांना करायची आहे. बाहेरील व्यक्ती येऊन जर आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात येऊन तेथील शांततेला बाधा आणत असेल तर अशांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी पोलिसांना साथ देण्याची गरज आहे.
सुरुवातीला गोठणकर यांनी राजापूर तालुक्याची शांतता, सलोख्याची परंपरा अबाधित राहील याची दक्षता प्रत्येकाने घेऊया, असे आवाहन केले तर व्यापारी संघटनेचे दीनानाथ कोळवणकर यांनी बाजारपेठेतून एकदिशा मार्गी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. अॅड. खलिफे यांना शहरातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्याची ग्वाही देताना अवैध दारूधंद्याना आळा घालण्याची मागणी केली तसेच पोलिस पाटील संघटना, व्यापारी संघटना, बौद्धजन संघटना, मुस्लिम संघटना अशा विविध संघटनांच्या वतीने बगाडे यांचा सन्मान करण्यात आला.
अमली पदार्थांविरोधात मोहीम
जिल्ह्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. त्यामुळे अमली पदार्थांविरोधात मोहीम हाती घेतली असून, आपल्या आजूबाजूला असे गैरकृत्य घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बगाडे यांनी केले. त्यासाठी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असाही इशारा दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 03/Jun/2025














