रत्नागिरी : अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचा लाभमिळावा तसेच २३ जुलै २०२४चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक रद्द करून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ऑर्गनायझेशन फॉर राईटस ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) तर्फे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
ऑफ्रोहच्या रत्नागिरी शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, ते निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आले. अनुसूचित जमातीतील कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द करण्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना २१ डिसेंबर २०२१ ला अधिसंख्य पदावर वर्ग करून अन्याय केला होता.
या अन्यायाची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने १४ डिसेंबर २०२२ला नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्त वेतन मंजूर केले तसेच त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ला नियमित वेतनवाढ मिळण्यासाठी एक दिवसांचा तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आला. तथापी १०, २०, ३० वर्षानंतर आश्वासित प्रगती योजना व नियमित पदोन्नतीचे लाभ आणि अनुकंपा नोकरीवर धोरणाचे लाभ नाकारण्यात आले. हे लाभ मिळावेत यासाठी ऑफ्रोहतर्फे अनेकवेळा निवेदने देण्यात आली; परंतु शासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी ऑफ्रोह महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा पारशे, उपाध्यक्ष सुनंद फुटक, कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, ऑफ्रोह रत्नागिरीचे सचिव किशोर रोडे, उपाध्यक्ष नंदा राणे, कोषाध्यक्ष सतीश धावट, वसंत म्हस्के, श्रीकृष्ण भांडे, विलास धावट, गोकुळा धनी, प्रमिला धावट, कमल वडाळ, संगीता रामागडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 03/Jun/2025














