लांजा : भाकर या स्वयंसेवी संस्थेतर्फे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार व हुंडाविरोधी चळवळ पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही पदयात्रा ६ व ७ रोजी आंबोळगड ते जयगड या मार्गावर काढली जाणार आहे.
(कै.) अरुणा पाटील यांनी १९९३ मध्ये भाकर या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ३२ वर्ष संस्थेने अनेक सामाजिक प्रकल्प राबवले. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे पाणलोट प्रकल्प, मजुरांच्या मुलांसाठी ४० बालवाड्या, माता व बालसंगोपन, ४५० बचतगट, गुजरात भूकंप मदतकार्य, चारा छावणी, महिला सहाय्यता कक्ष, स्वच्छ भारत अभियान, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास, जलजीवन मिशन, महिला समुपदेशन केंद्र, लांजा व राजापूर, आजीआजोबांचे गाव (वृद्धाश्रम) व महिला पुनरुत्थान केंद्र (महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे) असे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडले.
पुण्यातील कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळी प्रकरणाविरुद्ध व समाजात घडत असलेल्या अशा अमानुष कृत्याविरोधात जनजागृतीपर पदयात्रेचे आयोजन केले आहे. ६ व ७ ला आंबोळगड ते जयगड यामार्गे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार व हुंडाविरोधी चळवळ पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेत हुंडा देणे-घेणे कायद्याने चुकीचे आहे. त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वांना या पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 03/Jun/2025














