रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, सागरी महामार्गावर नऊ खाडीपूल मंजूर झाले आहेत. मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड मार्गाच्या डीपीआरचे काम सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त सांगितले.
रत्नागिरीत आयोजित कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष रखडला असून, हा रस्ता करताना काही ठेकेदार व्यवस्थित भेटले नाहीत. काहींनी चांगले काम केल्याचेही त्यांनी सांगितले. आपले दुर्दैव की, रस्ता वेळेत पूर्ण झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील काही वर्षांत रत्नागिरीचा पर्यटन विकास चांगला झाला आहे. यासाठी नवनवीन उपक्रम राबवले गेले पाहिजेत, शासन सर्वसामान्यांच्या पाठीशी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
कोकणातील पत्रकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठीची जांभेकर पुरस्कार योजना व पत्रकार कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच यावर अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 03/Jun/2025














