रत्नागिरी : मोसमी पावसाने सुरूवात केली असली तरीहा दोन दिवस पूर्णतः विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बळीराजाची धावपळ पुन्हा सुरू झाली आहे. कृषी विभागाकडून भातबियाणे आणि खत पुरवठ्यासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्याला १२,९०९ मे.टन खतापैकी ३ हजार ९८४ मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. तसेच २ हजार ३१३ क्विंटल संकरित व सुधारित बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ठेवले आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेल्या पावसाने गेले दोन दिवस उसंत घेतली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भात बियाणे तसेच खत खरेदीसाठी पावले उचलली आहेत.
त्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी संकरित वाण असलेली १९५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. त्यापैकी १२१.९ क्लिंटल बियाण्यांची विक्री झाली, तर सुधारित वाणाची २११८ क्विंटल बियाणे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आतापर्यंत ११५४.२ क्विंटल बियाणे विक्रीला गेली आहेत. एकूण मागणी असलेल्या ७ हजार ४२४ क्विंटल बियाण्यापैकी २ हजार ३२३ क्विंटल बियाणे प्राप्त झालेली आहेत. १२७६ क्विंटल भात बियाण्यांची विक्री करण्यात आली आहेच. खरिपासाठी जिल्ह्याला १२,९०९ मे.टन खत आवंटन मंजूर झालेले आहे. २६ मेपर्यंत ३,९८४ मे.टन खत प्राप्त झालेले आहे. त्यात युरिया खत २२०२ मे.टन, एसओपी खत २५ मे.टन., संयुक्त खत १४३९ मे.टन, एसएसपी २८२ मे.टन खतपुरवठा झालेला आहे.
जिल्ह्यात मॉन्सून दाखल झालेला असल्यामुळे आता खरिपाच्या पेरणी, शेत नांगरणीच्या कामांनाही गती येणार आहे. खरिपासाठी जिल्ह्यात शेताच्या बांधावर खत पोहोचवण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. खताचा पुरवठा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 03/Jun/2025














