परशुराम घाट परिसरातील भराव थेट पेढेतील शेतात; गाळाने भरली एक विहीर

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गतवर्षी पावसाळा संपता संपता कोसळलेली संरक्षक भिंत आणि मातीचा भराव मुसळधार पावसात वाहून पायथ्याशी असलेल्या पेढे गावातील शेतीत घुसला आहे. या भागातील शेतीसह सर्वत्र चिखल साचला असून, पाणकरवाडीतील विहीर आणि रेल्वेट्रॅकवरील मोरीही गाळाने भरली आहे. गावकऱ्यांसह महसूल कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली आहे.

गतवर्षी पावसाला सुरुवात झाल्यानंतर २७ जूनला परशुराम घाटात संरक्षक भिंतीसह मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर पाऊस जाता जाता ऑक्टोबर महिन्यात पुन्हा घाटात ४० मीटर लांबीची भिंत कोसळली शिवाय तेथील मातीचा भरावही वाहून गेला. घाट धोकादायक बनल्याने तेथील मार्गिका बंद करून पर्यायी वाहतूक दुसऱ्या मार्गिकवर वळवण्यात आली. त्यानंतर तेथील धोकादायक वाट असलेल्या भिंती पाडून तेथे सध्या गॅबियन भिंत उभारण्यात येत आहे; मात्र घाटाच्यादृष्टीने वरकर उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी कोसळलेलो भिंत, मातीचा भराव हा घाटातील दरीत अर्ध्यावरच जाऊन थांबला भिंत कोसळल्यानंतर पुढे तितकासा मोठा पाऊस पडला नसल्याने मलबा अर्ध्यावरच अडकला होता; मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात हा मलबा पेढे गावातील शेतजमिनीत वाहून आला आहे. तेथील एक विहीरही गाळाने भरली आहे.

वाहून आलेला गाळ हा तेथील शेतात गेल्याने दहा ते पंधरा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना महामार्गाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर महसूल कर्मचारी विजया मिटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान सरपंच आरूषी शिंदे, उपसरपंच निशा माळी, अष्टविनायक टेरवकर, रुपेश शिंदे, संतोष पाणकर, राष्ट्रीय महामार्ग उपविभागचे अधिकारी महाडकर आणि सहकारी तुषार मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

तर रेल्वेरुळावरून पाणी जाणार
या ठिकाणातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरील मोरी गाळाने काठोकाठ भरली आहे. हा गाळ तेथून न काढल्यास पाणी जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने येणान्या पावसात रुळावरून पाणी जाण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली

गाळ बाजूला करण्याचे काम सुरू
पेढे येथील बौद्धवाडी, कुंभारवाडी, मोरेवाडी व पानकरवाडी येथील २० ते ३० एकरमध्ये हा गाळ आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार, कंपनीच्या प्रतिनिधींनी येथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानुसार शेतात आलेला गाळ बाजूला करण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 03/Jun/2025