तंत्रज्ञानाचा वापर करताना स्वत्व सोडून आहारी जाणार नाही, याची काळजी घ्या : हेमराज बागुल

रत्नागिरी : ‘नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना ती आपल्यावर मात करणार नाहीत, वर्चस्व गाजवणार नाहीत, स्वत्व सोडून त्याच्या आहारी आपण जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी आपल्यातील सुजनशीलता जपली व संवर्धित केली पाहिजे,’ असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आयोजित कोकण विभागातील पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘शिळा प्रेस ते डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अशा पद्धतीने तंत्रज्ञानाच्या अंगाने माध्यमे समृद्ध झाली आहेत.

नवे तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने पत्रकारितेला पूरक आहे, ते मारक नाही. या तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकार आपली व्यावसायिक गुणवत्ता वाढवू शकतात. कोणतेही तंत्रज्ञान मानवी जीवन समृध्द करण्यासाठी वापरता येते. किंबहुना ते त्यासाठीच असते. तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे आपण ठरवावे. माहिती प्रगतीमुळे पत्रकारितेत क्रांती झाली आहे. आंतरजालाच्या जोरावर समाजमाध्यमांमधून बातमी क्षणार्धात जगभरात पसरते.

त्यामुळे माहिती मिळविणे सोपे झाले आहे. एकोणिसाव्या शतकात समाजसुधारकांनी समाजात सकारात्मक प्रबोधन घडवून आणण्यासाठी पत्रकारितेचा प्रभावीपणे वापर केला. यापुढील काळातही ही जबाबदारी माध्यमांनी आपल्याकडे असावी या दृष्टीने विचारमंथन करून भूमिका बजावली पाहिजे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 03/Jun/2025