संगमेश्वर : संगमेश्वर-देवरुख महामार्गावर बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयासमोर आज मंगळवार, ३ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रेनॉल्ट क्विडने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने रेनॉल्ट क्विडमधील तीन प्रवाशांचा एअरबॅगमुळे जीव वाचला, तर एका महिलेला किरकोळ दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून संगमेश्वरकडे सिमेंट घेऊन निघालेला कंटेनर (एमएच १३ डीक्यू ७७४७) बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयासमोर टायरच्या बिघाडामुळे उभा होता. याचवेळी, मालवणहून ठाण्याकडे जाणाऱ्या भरधाव रेनॉल्ट क्विड (एमएच ०४ केए ००९४) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्विड गाडी कंटेनरच्या मागील चाकाखाली गेली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातात रेनॉल्ट क्विडमध्ये प्रवास करणारे ठाणे येथील रुपेश सहदेव पालव (वय ४३), सुविधा सहदेव पालव (वय ६५) आणि ऋतुजा रुपेश पालव (वय ३६) हे तिघेही अडकले होते. सुदैवाने, गाडीतील पुढील एअरबॅग्स तात्काळ उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि तिघेही बचावले. या अपघातात सुविधा पालव यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना त्वरित पूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बलकर कंटेनरचा चालक शकिल इस्माईल खतीब (वय ५३, रा. बेळगाव) हा अपघातानंतर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 03/Jun/2025














