Sanjay Raut News: मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीच्या पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.
ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्या नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आत्तापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शाह यांनीही शिवसेना संपवण्यासाठी जंग पछाडले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा तुम्ही आज वापरत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही राजकारणात कोण होतात? तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
पक्ष फोडण्यासाठी भाजपने दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन
गिरीश महाजन जे बोलतात, ती भाषाच त्यांना, पक्षाला घेऊन बुडणार. पक्ष फोडण्यासाठी भाजपने जे दलाल नेमले आहेत त्यातील पहिले गिरीश महाजन आहेत. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणार पहिला माणूस म्हणजे गिरीश महाजन असेल. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू झाली, त्यावेळी ते पक्ष बदलायला तयार होते, असा मोठा दावा करतानाच, राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो, असे निरोप तेच पाठवत होते. हे एक नंबरचे डरपोक लोक आहेत, अशी टीका राऊतांनी केली.
दरम्यान, सुनील प्रभु आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू असेल तरी ती समोर कशाला येईल? योग्य वेळी ती सांगू, असे राऊतांनी म्हटले आहे. तसेच भारताची अवस्था जगात अत्यंत बिकट झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीच उभे राहिले नाही. भारताला जगात एकही मित्र देश नाही, असा दावा संजय राऊतांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 03-06-2025














