गुहागर पोलिस ठाण्यात सामाजिक सलोखा समिती स्थापन

आबलोली : गुहागर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आली असून, समितीतील सदस्यांची पोलिस ठाणे येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गुहागर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची संकल्पना असलेली “सामाजिक सलोखा समिती” स्थापन करण्यामागचा उद्देश सर्व सदस्यांना समजावून सांगितला. तसेच सामाजिक सलोखा राखण्यासंदर्भात उपस्थितांना विविध सूचना करण्यात आल्या.

यावेळी पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात सामाजिक शांतता राहावी यासाठी सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या कमिटीच्या माध्यमातून पोलिस ठाणे स्तरावर महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, कमिटी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून या समितीच्या वतीने सर्व धार्मिक सण आनंदात साजरे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याबाबत नमूद केले.

आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने गोवंश हत्या तसेच गोमांस वाहतूक इत्यादी वरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन प्रयत्न करण्याबाबत सांगण्यात आले. सायबर क्राइमबाबत सतर्क राहणे ऑनलाईन नवनवीन येणारे किंवा आर कोड बाबत सूचना दिल्या. शहर व गावात अमली पदार्थविरोधी मोहीमअंतर्गत नशापान करणारे, बाळगणारे व विक्री करणाऱ्या अशा घटकांवर लक्ष ठेवणे, सर्व धार्मिक सण उत्सवात कोणत्याही समस्या असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

या बैठकीसाठी सामाजिक सलोखा समितीचे २४ सदस्य उपस्थित होते. यामध्ये वकील सुशील अवेरे, गुहागर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, सामाजिक कार्यकर्ते साबिर साल्हे, दीपक परचुरे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कदम, पाटपन्हाळे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण, पत्रकार गणेश किर्वे, बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, सुधाकर कांबळे, श्याम आठवले, संतोष वरंडे, पत्रकार सत्यवान घाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप भोपळे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 03/Jun/2025