राजापुरात रिक्षाचालकाने अंगावर ओतून घेतले पेट्रोल

राजापूर : स्टँडवर रिक्षा लावायला न दिल्याने राजापुरात एका रिक्षाचालकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी राजापूर जवाहर चौक येथे घडली आहे. मात्र, जागरूक नागरिकांमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या एका गावातील तरुणाने नव्यानेच घेतलेली रिक्षा शहरातील जवाहर चौक येथील रिक्षा स्टँडवर व्यवसायासाठी उभी केली होती. आठवड्यापूर्वी एका बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करण्यासाठी रिक्षा घेतली होती. मात्र, शहरातील रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यास येथील काही रिक्षा संघटनांनी विरोध केला असल्याचे बोलले जात होते.

मात्र, येथील रिक्षा संघटनांनी त्याला त्या ठिकाणी रिक्षा लावून व्यावसाय करण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्या तरुण रिक्षाचालकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी दूरध्वनीवरून याची माहिती राजापूर पोलिसांना दिली.

राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी येत सदर रिक्षा व्यावसायिकाला राजापूर पोलिस स्थानकात नेले. आपण या रिक्षाचालकाला समज दिली असल्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी पत्रकारांना सांगितले.

या तरुणाने एका आठवड्यापूर्वी शहरातील एका बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करण्यासाठी रिक्षा घेतली होती. मात्र, शहरातील रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यास येथील काही रिक्षा संघटनांनी विरोध केला असल्याचे बोलले जात होते. गेला आठवडाभर हा विरोध कायम होता. सोमवारी सकाळी पुन्हा विरोध झाल्याने या तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 03/Jun/2025