चिपळूण : शंकरवाडी येथील नलावडे बंधाऱ्याचे काम पूर्ण

चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाळ उपशासह नलावडे बंधारा उभारण्यात आला असून, अपेक्षित मुदतीच्या पंधरा दिवस आधीच व अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण केल्याने शहरवासीयांकडून आमदार शेखर निकम व संबंधित ठेकेदार कंपनीचे कौतुक होत आहे.

चिपळूण शहर वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यानंतर दरवर्षी येथे महापूर किंवा पुरसदृश स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सलग दोन वर्षे गाळ उपसा केला जात आहे. शहरात पूररेषेच्या आत बांधकामे नियंत्रित करण्यात आली त्याचप्रमाणे पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारण्यात आला आहे.

पूर्वी येथे जुने दगडी बांधकाम असलेला बंधारा होता. परंतु २००५ च्या पुरामुळे तो वाहून गेला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. २०२१ च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिर्धीकडून सातत्याने होत होती. त्याची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी त्यासाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून आणला.

चिपळुणातील प्रीमियर सिव्हिल काँट्रॅक्ट या कंपनीमार्फत हे काम अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केले. २३ डिसेंबर २०२४ रोजी आमदार निकम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. २७५ मीटर लांब व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे. या कामाची मुदत दोन वर्षे असताना ठेकेदार कंपनीने तोंडावर असलेला पावसाळा व त्यात उद्भवणारी आपत्ती लक्षात घेत १५ जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याआधीच हे काम पूर्ण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 03/Jun/2025