संगमेश्वर : धोकादायक ठिकाणांची पाहणी करावी; श्रृंगारपूर सरपंचांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

देवरुख : अतिवृष्टीच्या काळात धोकादायक परिस्थिती निर्माण झालेल्या भागात पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी श्रृंगारपूरचे सरपंच विनोद पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर गंभीर परिस्थिती झाली आहे. संगमेश्वर बसस्थानक ते शास्त्री पूल रस्त्याची दयनीय परिस्थिती झाली असून, या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याठिकाणी चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागाची पाहणी करावी आणि योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी पवार यांनी केली आहे.

शास्त्री पूल ते नायरी, तिवरे, शृंगारपूर, कातुर्डी कोंड, निवळी, नेरदवाडी या ग्रामीण भागाला जोडलेल्या रस्त्यांची, रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत, गटारे यांची सद्यस्थिती पाहिली तर अतिवृष्टीमुळे रस्ते खचून या गावांचा वाहतुकीचा संपर्क तुटू शकतो. या गावांना वाहतुकीसाठी अन्य पर्यायी मार्ग नसल्याने या दरम्यान कोणत्याही प्रकारचा धोका अथवा दुर्घटना झाल्यास
ग्रामस्थांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल.

या भागातील गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या गावांची पाहणी करुन तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे पत्र विनोद पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 03/Jun/2025