लांजा, ०३ जून २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. साटवली भंडारवाडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच हजार रुपये किमतीची विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या प्रकरणी एका महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जान्हवी सुनील मांजरे (ब.नं. ४७९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०२ जून २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास त्यांना साटवली भंडारवाडी, ता. लांजा येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पथकासह छापा टाकला.
छाप्यादरम्यान, पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातून विक्री करण्याच्या उद्देशाने गैरकायदेशीरपणे बाळगलेली विदेशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
जप्त केलेल्या दारूचा तपशील:
बॉब्स लेमन व्होडका: १८० मिली मापाच्या २६ प्लास्टिक बाटल्या, प्रत्येकी ३० रुपये किंमत, एकूण किंमत ७८०/- रुपये.
हनी ब्लेंड प्युअर व्हिस्की: १८० मिली मापाच्या २३ प्लास्टिक बाटल्या, प्रत्येकी ३० रुपये किंमत, एकूण किंमत ६९०/- रुपये.
हायवर्ड फाईन व्हिस्की: १८० मिली मापाच्या १० प्लास्टिक बाटल्या, प्रत्येकी ३० रुपये किंमत, एकूण किंमत ३००/- रुपये.
गावठी हातभट्टीची दारू: पाव लिटर वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधलेली एकूण ३० पिशव्या, म्हणजेच एकूण ७.५ लीटर दारू, एकूण किंमत ७५०/- रुपये.
जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत २,५२०/- रुपये आहे.
लांजा पोलिसांनी या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) नुसार तिला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 03-06-2025














