गुहागर : गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील श्री हनुमान मंदिरात मध्यरात्री झालेल्या चोरीचा गुहागर पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला आहे. मंदिरातून दानपेटी चोरून नेणाऱ्या सौरभ संतोष कदम (रा. मळण रोड, श्रृंगारतळी, ता. गुहागर) या आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
काय घडले?
सोमवारी मध्यरात्री 2 जून 2025 रोजी अज्ञात चोरट्याने कोतळूक येथील श्री हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यात ठेवलेली लाकडी दानपेटी चोरून नेली. ही माहिती गुहागर पोलीस ठाण्याला मिळताच, तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर 40/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 331 (4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड आणि चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी तात्काळ एक विशेष पथक नेमले. गोपनीय माहिती आणि मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला.
घटनेच्या अवघ्या चार तासांतच, म्हणजेच मंगळवारी पहाटेपर्यंत, आरोपी सौरभ संतोष कदम याला मळण रोड, श्रृंगारतळी येथून ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, चोरलेला 100% मुद्देमालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
गुहागर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे ही चोरी अवघ्या 4 तासांत उघडकीस आली. आरोपी सौरभ संतोष कदम याच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. तसेच, या आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या मंदिर चोऱ्या किंवा घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याबाबतही अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने आणि गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुजीत सोनावणे, म.पो.ना/2074 स्वामिनी नाटेकर, पोकॉ/196 वैभव चौगले, पोकॉ/271 प्रतिक रहाटे, पोकॉ/1277 प्रथमेश कदम, पोकॉ/779 निखील पाटील आणि म.पोकॉ/1453 सिमा मोटे यांनी यशस्वी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:45 AM 04/Jun/2025














