IPL 2025 Final: आरसीबी अखेर आयपीएल चॅम्पियन!, पंजाबवर 6 धावांनी विजय

IPL 2025 Final RCB vs PBKS : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र स्टेडियमवर आयपीएलच्या 18 व्या हंगामाची फायनल पार पडली. आरसीबीनं पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत करत 18 व्या आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.

आरसीबीच्या विजयामुळ विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर झाले. आरसीबीच्या विजेतेपदाचा शिलेदार आणि नेता म्हणून रजत पाटीदारची कामगिरी देखील महत्त्वाची ठरली. रजत पाटीदार यानं विराट कोहलीसाठी आयपीएलचं विजेतेपद मिळवणार असं म्हटलं होतं. ते त्यानं सांघिक कामगिरीच्या जोरावर करुन दाखवलं.

रजत पाटीदार आरसीबीच्या विजयाचा नेता

रजत पाटीदारनं यंदा पहिल्या हंगामात आरसीबीचं नेतृत्त्व केलं. रजत पाटीदार काही सामन्यांमध्ये खेळला नव्हता मात्र क्वालिफायर आणि फायनलमध्ये रजत पाटीदारनं संघाचं नेतृत्त्व केलं. रजत पाटीदारनं आजच्या मॅचमध्ये वेळोवेळी गोलंदाजीमध्ये बदल करत पंजाबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवू दिला नाही. रजत पाटीदारनं स्पिन गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी याचा योग्य पद्धतीनं वापर केला.

रोमारिओ शेफर्डला गोलंदाजी देण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला

पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये होता. गेल्या मॅचमध्ये त्यानं नाबाद 87 धावांची खेळी केली होती. जोश हेझलवूडला गोलंदाजी मिळेल अशी शक्यता असताना रजत पाटीदारनं रोमारिओ शेफर्डला गोलंदाजी दिली आणि त्यानं श्रेयस अय्यरला 1 रनवर बाद केलं पंजाबच्या हातून मॅच निसटली. कृणाल पांड्याचा देखील रजत पाटीदारनं प्रभावी वापर केला. कृणाल पांड्यानं प्रभासिमरन सिंह आणि जोश इंग्लिसला बाद करत आरसीबीच्या विजयाच्या दिशेनं वाटचाल केलं.

रजत पाटीदारनं शब्द खरा केला

रजत पाटीदार आयपीएल फायनल पूर्वी पत्रकार परिषदेत आम्ही प्रयत्न करु आणि विराट कोहलीसाठी जिंकू असं म्हटलं. टीम इंडिया आणि आरसीबीसाठी त्यानं अनेक वर्ष खूप योगदान दिलं आहे, त्याच्यासाठी आयपीएल विजेतेपद मिळवायचं असं रजत पाटीदार म्हणाला होता. त्यानं त्याचा शब्द पूर्ण केला.

श्रेयस अय्यरननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 190 धावा केल्या. विराट कोहलीनं आरसीबीसाठी सर्वाधिक 43 धावा केल्या. फिल सॉल्ट 16 धावा करुन बाद झाला. विराट कोहलीनं मयंक अग्रवाल सोबत 38 धावांची भागीदारी केली. मयंक अग्रवाल 24 धावा केल्या. यानंतर आऱसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार 26 धावा करुन बाद झाला. विराट सोबत त्यानं 40 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला आझमतुल्लाह ओमरझाईनं बाद केलं. विराटनं 35 बॉलमध्ये 43 धावा केल्या. लियाम लिविंगस्टोननं 25 धावा केल्या. जितेश शर्मानं 24 धावा केल्या. अर्शदीप सिंह नं आरसीबीला 200 धावांच्या पार जाण्यापासून रोखलं. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन धावा देत तीन विकेट घेतल्या. रोमारियो शेफर्डनं 17 धावा केल्या. कुणाल पांड्यानं 4 धावा आणि भुवनेश्वर कुमारनं 1 रन केली. अर्शदीप सिंह आणि काइल जेमिसन या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. ओमरझाई, युजवेंद्र चहल आणि विजयकुमार व्यशकनं एक विकेट घेतली.

पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव, शशांकची एकाकी झुंज

प्रियांश आर्या आणि प्रभासिमरन सिंग या दोघांनी 190 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली होती. मात्र, अनावश्यक फटके मारत पंजाब किंग्जचे फलंदाज बाद झाले. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा अप्रतिम कॅच घेतला. प्रियांश आर्यानं 24 धावा केल्या, प्रभासिमरन सिंगनं 26 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 39 धावा केल्या. तर, शशांक सिंगनं नाबाद 61 धावा केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 04-06-2025