गुहागर : गुहागर तालुक्यातील कारूळ येथील दरडग्रस्त कुटुंबीयांना वाचविण्यासाठी मारण्यात आलेले गटार आता ग्रामस्थांच्या गैरसोयीचे ठरले आहे. गटारातील पाईपलाईन गटार खोदताना तोडून टाकण्यात आली असून येथील ग्रामस्थ ऐन जून महिन्यात पाच दिवसांपासून पाणी पाणी करीत आहेत. त्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.
गेली पाच-सहा वर्षे तालुक्यातील कारूळ येथील दरडग्रस्त कुटुंबाची वेदना कायम आहे. तेथील लोकांना गुहागर प्रशासनाच्या वतीने स्थलांतराची नोटीसदेखील बजावली होती.
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या ठिकाणी गटार मारण्याची शक्कल लढविली. मात्र, या गटाराने ग्रामस्थांवर नवी आपत्ती आली आहे. कारूळ येथील जांभळेवाडी, देसाईवाडी व गुरववाडी या तीन वाड्यांची नळपाणी योजना संबंधितांनी गटार खोदकाम करताना तोडली आहे.
त्यामुळे गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ येथील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. पाच वर्षांपूर्वी कारूळ येथील या तीन वाड्यांतील जमिनीला तडे गेले होते. काही ठिकाणी जमीन खचली होती. ३६ हुन अधिक घरांना त्यामुळे धोका निर्माण झाला होता.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या कुटुंबांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीस बजावल्या जातात. मात्र, ठोस व्यवस्था केली जात नाही.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ठिकाणी गटार मारणे आवश्यक होते तेथे खोदाई न करता ज्या भागातून ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाईप जात होते त्याच ठिकाणी जेसीबी लावून चर खोदण्यात आला व यामध्ये पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन तोडली गेली आहे. त्यामुळे ऐन जूनमध्ये येथील ग्रामस्थांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, काम सुरू असताना काही लोकांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचे कारण देत कारवाई करू असे सांगितल्याने ग्रामस्थ शांत झाले. मात्र, मुख्य रस्त्याच्या बाजूने गटार मारल्याने रस्ता खचून नवीन समस्या निर्माण होणार आहे.
शासन पाणी तरी देईल का?
कारूळ ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने ग्रा.पं. मध्ये प्रशासक आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या पाणी समस्येकडे कोणाचेही लक्ष नाही. दरडप्रवण क्षेत्र असल्याने आपत्तीग्रस्त म्हणून या तीन बाड्या घोषीत झाल्या आहेत. मात्र कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. शासनाने गटार मारले पण चुकीची खोदाई केली. त्यामुळे आता पाणीटंचाई ओढवली आहे. शासनाने आमचे पाणीदेखील बंद केले आहे. त्यामुळे याकडे कुणी लक्ष देईल का, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ नितीन देसाई, एकनाथ देसाई यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 04/Jun/2025














