लांजा : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने कारला धडक दिल्याने कारमधील दोन लहान बालके जखमी झाली. हा अपघात गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी घाट येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित के. रविंद्रन (३७ वर्षे, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) हे आपल्या ताब्यातील एमजी एस्टर कार (क्र. एम. एच. १० डीटी ३३३४) घेवून मुंबईच्या दिशेने चालले होते. या कारमध्ये दोन कुटुंबातील आठजण प्रवास करत होते. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कार मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी घाटी येथे आली असता मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलरने (क्र. एमएच ४६, बीएफ ६३९४) एस्टर कारला धडक दिली. हा ट्रेलर राम आशिष (२५ वर्षे, रा. बबनपुरवा तालुका उत्तरवाला, जिल्हा बलरामपुर, उत्तर प्रदेश) हा चालवित होता. ट्रेलरने दिलेल्या या धडकेत कारमधील गौरी एम. साजिश (१० वर्षे) आणि जियान एम. साजिश (५ वर्षे, दोन्ही राहणार नाशिक ओझर एअरफोर्स नाशिक) हे दोघे जखमी झाले आहेत.
महामार्गाच्या उताराच्या परिस्थितीकडे लक्ष न देता ट्रेलर हा अविचाराने व भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रेलर चालक राम आशिष याच्यावर भारतीय न्याय संहिता क्रमांक २८१, १२५ (अ) मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. राजेंद्र कांबळे हे करत आहेत.