नऊ तास दुरुस्ती करूनही रात्रीत दोनवेळा बिघाड; साखरपा महावितरणचा कारभार..

साखरपा : साखरपा महावितरणचा कारभार सुधारण्याची चिन्हं दिसत नाहीत. सोमवारी दिवसभर दुरुस्ती देखभालीसाठी पंचक्रोशीतील विद्युतपुरवठा नऊ तास बंद ठेवल्यानंतरही लगेच काही तासांतच दोनवेळा बिघाड होऊन तब्बल तीन तास ग्रामस्थांना रात्री अंधारात राहावे लागले.

सोमवारी साखरपा महावितरणच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिवसभर विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच नऊ तास वीज नव्हती; पण त्यानंतर लगेचच रात्री एकदा नाही तर दोनवेळा पुन्हा बिघाड निर्माण झाला आणि काही गावांना अंधारात रात्र काढावी लागली. रात्री अकरा ते बारा या एक तासात मेढे, दाभोळे, कनकाडी आदी गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित झाला. बारा वाजता तो पुन्हा सुरळीत झाला असता पुन्हा मध्यरात्री दीड ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत पुन्हा बिघाड निर्माण होऊन हा पुरवठा पुन्हा खंडित होऊन रात्री दोन तास ग्रामस्थांना अंधारात राहावे लागले.

गेले आठवडाभर रात्री विद्युतपुरवठा तास-दोन तास खंडित होण्याचे प्रकार रोज घडत आहेत. नऊ तास दुरुस्ती आणि देखभाल झाल्यावर अवघ्या पाच तासात परत बिघाड निर्माण होतोच कसा ? दुरुस्तीच्या नावाखाली नेमके काय सुरू असते ? लाइनमध्ये होणारे बिघाड हे नेमके रात्रीच कसे होतात ? असे संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 04/Jun/2025