एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून-२०२५ पासून ४६ ऐवजी ५३ टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सह्याद्री अतिथिगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी शिंदे बोलत होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध अधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित अशी चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्यां सोबतच बसस्थानके देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे. एसटीच्या माध्यमातून मालवाहतूक (कार्गो सेवा) सुरू करण्यावर भर दिला जावा, तसेच बसस्थानके ही बस पोर्ट झाली पाहिजेत.

एसटी तोट्यातून बाहेर कशी काढता येईल याचा अभ्यास करून एसटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत.” एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. याचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

एक कोटींचे विमा कवच
कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच देण्यात येणार असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता वर्षभरासाठी वापरता येईल. महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ किंवा ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती’ योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 04/Jun/2025