सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १६ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास व सवलतीच्या पासचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे बोनाफाईड मुख्यापकांनी दिल्यास त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लालपरी’च्या प्रवासाचे पास मिळणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एसटीच्या बसगाड्यांमधून दरवर्षी सरासरी १५ लाख मुले-मुली मोफत पासद्वारे प्रवास करतात. मुलींसाठी १०० टक्के सवलत असून मुलांना तिकीट दराच्या ३४ टक्के शुल्क भरल्यास त्यांना देखील सवलतीचा पास मिळतो. एसटी महामंडळाच्या बसमधून सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास आहे. तर लाडक्या बहिणींना ५० सवलत आहे. याच पद्धतीने शाळा महाविद्यालयातील मुलींसाठी देखील मोफत प्रवासाची योजना लागू आहे.
मुला-मुलींना द्यावे लागणार बोनाफाईड
एलकेजी, युकेजी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मोफत पासची योजना सुरू आहे. मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना आहे. पास काढण्यासाठी मुलींना किंवा मुलांना त्या बोनाफाईड व एक छायाचित्र द्यावे लागणार आहे. मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत बस पास द्यायचे असल्यास त्यांनी तसे पत्र आगारप्रमुखांना द्यायचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 PM 04/Jun/2025














