रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीत (रत्नागिरी) मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यामधून नैसर्गिक गांडूळखत बनवले जाते. राज्यातील हा पहिला पायलट प्रकल्प आहे. रत्नागिरी शहरासह पाच ग्रामपंचायतींमधील मैला गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते; मात्र मैला संकलनासाठी सक्शन व्हॅन नसल्याने ग्रामपंचायतीतील रत्नागिरी नगरपालिकेच्या वाहनावर अवलंबून राहावे लागत होते; परंतु नवीन वाहन घेण्यासाठी २८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद झाल्यामुळे व्हॅनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
स्वच्छ भारत मिशनमधून नाचणे येथे मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी शहरासह नाचणे, शिरगाव, मिरजोळे, खेडशी, कुवारबाव या पाच ग्रामपंचायतींमधील मैला गाळ आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पात मैला आणण्यासाठी स्वतःचे वाहन नसल्यामुळे रत्नागिरी पालिकेच्या वाहनावर अवलंबून राहावे लागते तसेच पाच ग्रामपंचायतींनाही पालिकेच्या वाहनावरच अवलंबून राहावे लागते. महिन्याला वाहनाच्या ३७ फेऱ्या गाळप्रक्रियेसाठी आणला जातो. गाळ काढण्यासाठी सहा हजार रुपये घेतले जातात. त्यातील पन्नास टक्के ग्रामपंचायतीला आणि उर्वरित पन्नास टक्के वाहनधारकांना मिळतात.
स्वतःचे वाहन असेल तर ग्रामपंचायतीला अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्या दृष्टीने जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने निधीची मागणी केली होती तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे नाचणे ग्रामपंचायतीकडून सरपंच भैया भोंगले यांनी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १७ सामूहिक विकास योजनेतून २०२५-२६ या वर्षासाठी प्राप्त निधीतून मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पात सक्शन व्हॅन खरेदीसाठी २८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नाचणे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
प्रकल्पातून अडीच टन खत
पाच ग्रामपंचायतींत सुमारे १२ हजार ३५७ कुटुंबे असून, लोकसंख्या ५५ हजार ४३९ आहे तर शहरात सुमारे दहा हजार कुटुंबे आहेत. मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासनाकडून १ कोटी २७ लाख ४१ हजार ८३९ रुपये निधी मिळाला होता. डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत सुमारे ८ लाख लिटर मैल्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामधून अडीच टन खत तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग आंबा, काजूसह फळबागायतींना केला जाणार आहे. हे खत १५ रुपये किलोने शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय ग्रामपंचायतीने केला आहे.
मैला गोळा करण्यासाठी वाहन खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. ती कार्यवाही काही दिवसांत केली जाईल. त्याचा ग्रामपंचायतीला फायदा होईल. सध्या पालिकेच्या वाहनाचा उपयोग केला जात होता. उघड्यावर टाकला जाणारा मैला गोळा करून त्यावर प्रक्रिया केल्याने आरोग्याचा प्रश्नही सुटणार आहे. – भैय्या भोंगले, सरपंच, नाचणे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 04/Jun/2025














