रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील उमेदच्या महिला प्रभाग संघांना देण्यात आलेल्या हाऊसबोट आता पावसाळी वातावरणामुळे किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कोतवडे आणि वाटद प्रभागांना देण्यात आलेल्या हाऊबोट तवसाळ खाडीकिनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत तर चिपळूण तालुक्यातील मालदोली प्रभागाची बोटही इथल्या खाडीकिनारी उभी आहे. पावसाळी हंगामानंतर सप्टेंबर महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन या हाऊसबोटी पुन्हा पर्यटन व्यवसायासाठी सज्ज होतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, राजापूर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी आता हाऊसबोट प्रकल्पाचा प्रस्ताव सिंधुरत्न समृद्धी योजनेतून सादर केला होता. या प्रकल्पाना मंजुरी मिळून जिल्ह्यातील पाच प्रभागसंघांना हाऊसबोटीसाठी १ कोटीप्रमाणे ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील जीवनज्योती महिला प्रभागसंघ आणि कोतवडे येथील एकता प्रभागसंघांच्या हाऊसबोटीचे लोकार्पण करण्यात आले.
वेळेआधीच पावसाने हजेरी लावल्याने आता या तिन्ही हाऊसबोटी किनाऱ्यावर सुरक्षितरीत्या उभ्या करण्यात आल्या आहेत. पावसाळी हंगामात इतर बोटीप्रमाणेच हाऊसबोटींनाही खाडीत अथवा समुद्रात जाण्यास मनाई असल्याने आता या बोटी खाडीकिनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात असणारा पाऊस तसेच वेधशाळेचा अंदाज लक्षात घेऊन या बोटी पुन्हा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 04/Jun/2025














