फणसाचे महत्त्व जगभर पोहोचवा : खासदार नारायण राणे

लांजा : फणसाचा विचार फक्त महाराष्ट्रात किंवा भारतापुरता न करता जगभर पोहोचवा, अशी सूचना खासदार नारायण राणे यांनी फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि मिथिलेश देसाई यांना केली.

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) लांजा येथील प्रगतिशील आणि युवा शेतकरी मिथिलेश देसाई यांच्या फणस बागेला सदिच्छा भेट दिली. कोकणातील फणस या पिकाबाबत करत असलेल्या कामाबाबत त्यांनी देसाई यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. लांजा येथील रहिवासी हरिश्चंद्र देसाई यांनी झापडे गावातील शेतात ७१ हून अधिक प्रकारच्या फणसाच्या झाडांची लागवड केलेली आहे.

त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे फणसकिंग म्हणूनच ओळखले जाते. हरिश्चंद्र देसाई व त्यांचे पुत्र मिथिलेश देसाई यांनी गेल्या काही वर्षांत काजू आणि आंबा यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोकणला फणसाचे महत्त्व दाखवून दिले आहे, तसेच भविष्यात फणसाला किती मागणी असेल व त्याचा काय उपयोग आहे, त्याचे महत्त्वही वेळोवेळी दाखवून दिले आहे. देसाई हे फणसावर करत असलेल्या नावीन्यपूर्ण कामाबद्दलची माहिती खासदार राणे यांनी वाचली होती. त्यामुळे रत्नागिरीतील कार्यक्रम संपल्यानंतर कणकवलीकडे जाताना त्यांनी देसाई यांच्या फणस बागेला भेट दिली.

या वेळी सोबत निलमताई राणे होत्या. कोकणात कुणीतरी दुर्लक्षित व वाया जाणाऱ्या फणस पिकावर काम करत आहे, हे समजल्यामुळे इथे आले असे सांगत राणे यांनी देसाई पिता-पुत्रांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. फणसाच्या झाडांची लागवड करण्याबाबत त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. या वेळी हरिश्चंद्र देसाई यांच्या हस्ते हरिश्चंद्रा व्हारायटीचे फणसाचे कलम खासदार राणे यांना भेट देण्यात आले. या वेळी मिथिलेश देसाई यांनी कोकणातील शेतीसाठी काही मागण्यांचे निवेदन यांना दिले.

फणस रोपांना मागणी
झापडे येथील देसाई यांच्या फणस बागेतून दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी फणसाच्या रोपांची विक्री केली जाते. गेल्या काही कालावधीत फणसाचा रोपांच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यांच्या बागेतील फणसाच्या झाडांची पाने निर्यात करण्यात आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 04/Jun/2025