जळगाव : राज्यातील कारागृहांमध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. जळगावमधील साई मार्केटिंग कंपनी आणि तिचे संचालक सुनील झवर यांचाही यात सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे.
त्यांनी सांगितले की, या घोटाळ्यातील ठेकेदार एका मंत्र्यांच्या जवळचा आहे. लवकरच पावसाळी अधिवेशनात या घोटाळ्याचे पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कारागृहातील कैद्यांच्या भोजनात देखील भ्रष्टाचार होत असल्याने ‘पंगती’त भ्रष्टाचाराच्या ‘कढी’ला उकळी फुटली आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर लगेचच 500 कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्यातील जिल्हा कारागृहांमध्ये जेवण आणि इतर वस्तूंच्या खरेदीत हा घोटाळा झाला आहे. बाजारात असलेली किंमत आणि दाखवलेली किंमत यात खूप फरक आहे, असेही त्यांनी सांगितले. या घोटाळ्यात जळगावमधील मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे समजले जाणारे साई मार्केटिंगचे संचालक सुनील झवर यांचे नाव राजू शेट्टी यांनी घेतले आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता.
एकनाथ खडसे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजू शेट्टी यांनी जे आरोप केले आहेत, ते जळगाव जिल्ह्यातील एका मंत्रांच्या जवळच्या ठेकेदारावर आहेत. जळगावच्या कारागृहात कैद्यांना मिळणारे जेवण अतिशय वाईट दर्जाचे असते. ‘ते अन्न जनावरे सुद्धा खाऊ शकत नाहीत,’ असेही खडसे म्हणाले. राजू शेट्टी यांनी राज्यभरातील कारागृहांमधील 500 कोटींचा घोटाळा उघडकीस आणला आहे. यात जळगावच्या एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश असल्याचे खडसे यांनी सांगितले. श्री. खडसे यांच्याकडे या घोटाळ्याचे सर्व पुरावे आहेत.
ते म्हणाले, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुराव्यांसकट मांडणार असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. राज्यभरात या पाच ठेकेदारांनी मिळून एक साखळी तयार केली आहे. हे लोक जिल्हा कारागृहांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवतात. जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या आशीर्वादाने एका ठेकेदाराने हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे. जळगावच्या ठेकेदाराची खरच चौकशी होऊन कारवाई होते की मंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांचे खिसे भरले जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच, राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांनी केलेले आरोप किती खरे आहेत, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 04-06-2025














