महाराष्ट्र हायस्कूल रोडवरील अतिक्रमणे चिपळूण पालिकेने हटवली

चिपळूण : चिपळूण नगर परिषद प्रशासनाने सोमवारी (दि.३) सायंकाळी ४:३० च्या सुमारास शहरातील मार्कडी स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल बायपास रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे बाजूला हटविण्याची कारवाई केली. दरम्यान, ज्या व्यक्तीने रस्ता खोदून शेड उभारली होती अशा व्यावसायिकावर कारवाई करीत संबंधितावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील खाद्यपदार्थाच्या गाड्या न.प.ने हटवून संबंधित व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. ही जागा नव्याने झालेल्या बायपास मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने उपलब्ध करून देण्यात आली. वर्षभराच्या कालावधीत सुरुवातीला कमी संख्येने खाद्यपदार्थ विक्रेत्यांची संख्या सुमारे ५० हून अधिक झाली. परिणामी, काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. दिलेल्या जागेपेळा ज्यादा जागेचा वापर तसेच रस्त्याच्या बाजूला आखून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर व्यावसायिकांनी शेड उभी करण्यास सुरुवात केली.

पावसाळ्यात अतिक्रमणाचा गैरफायदा घेण्यासाठी काहींनी डांबरी रस्त्यावर खड्डे खोदून पक्के स्टीलचे बार लावून शेड उभ्या केल्या. अनेक व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेलाच ग्राहकांसाठी खुर्चा मांडून वाहतूक धोकादायक व अडथळा होईल अशा पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवले. काहीवेळा या ठिकाणी छोटे अपघात देखील झाले. या सर्व गोष्टींच्या तक्रारी नगर परिषदेकडे होऊ लागल्या. अखेर मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी कारवाई करून संबंधित खाद्यपदार्थ व्यावसायिकांचे स्टॉल्स पट्ट्याच्या मागे नेण्यात आले.

तसेच ज्या व्यक्तीने रस्ता खोदून शेड उभी केली त्या गोवळकोट येथील शोएब मुकादम याच्यावर कायदेशिर कारवाईचा निर्णय घेतला. या कारवाईत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभागामुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक महेश जाधव, अम्नीशमन अधिकारी आनंद बामणे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, बापू साडविलकर, अमोल वीर, संदेश टोपरे, सचिन शिंदे आदीसह अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी सहभागी झाली होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 04/Jun/2025