खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला रघुवीर घाट सध्या कोकणातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १ हजार ४०० मीटर उंचीवर असलेला हा घाट परिसर थंड हवामान, हिरवाईन नटलेले डोंगर आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांनी पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.
पावसाळा सुरू होताच घाटावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा या शहरांसह परदेशातूनही पर्यटक येथे भेट देत आहेत. दरवर्षी लाखो पर्यटकांचा ओघ इथे पाहायला मिळतो. खोपी गावाच्या हद्दीत असलेल्या या घाटाचे सौंदर्य केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर निसर्गप्रमीना मोहवते.
रघुवीर घाट हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार मानला जातो. येथून कांदाटी खोऱ्यात जंगल सफारी सुरू करण्याची शक्यता असल्याने, वन्यजीव निरीक्षक आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठीही हे एक महत्वाचे केंद्र ठरू शकते. घाटाच्या परिसरात असलेले घनदाट जंगल, विविध पक्षीप्रजाती आणि जैवविविधता निसर्गप्रेमीसाठी पर्वणी ठरते.
खेड हे रघुवीर घाटासाठी सर्वात जवळचे शहर असून, कोकण रेल्वेवरील खेड रेल्वे स्थानक आणि खेड बस स्थानकातून माटापर्यंत बस व स्थानिक वाहतूक साधनांची उपलब्धता आहे. खेड हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने खासगी वाहनांद्वारेही घाटापर्यंत सहज पोहोचता येते. रत्नागिरी (११६ कि.मी.), पुणे (२९३ कि.मी.) आणि मुंबई (३२८ किमी) हे प्रमुख विमानतळ घाटासाठी प्रवेशद्वार ठरू शकतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, निसर्गाने भरभरून दिलेला आणि पावसाळी पर्यटनासाठी स्वर्गवत वाटणारा रघुवीर घाट निसर्गप्रेमीसाठी आणि पर्यटनप्रेमींसाठी खरोखरच एक आदर्श ठिकाण आहे. या घाटाचे स्वर्गवत वाटणारे सौंदर्य पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे.
पर्यटन महामंडळाचे योगदान आवश्यक…
पर्यटन विकास महामंडळाने जर येथे आवश्यक त्या सुविधा माहिती केंद्रे, शौचालये, निवास व्यवस्था आणि दृश्य बिंदू (view points) उभारल्यास रघुवीर घाट कोकणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेले पर्यटनस्थळ ठरू शकते.
पर्यटन विकासाची गरज…
रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचे मूळ गावही याच मार्गावर आहे. त्यामुळे घाटाचा विकास करण्यासाठी सरकारकडून विशेष लक्ष दिल्यास, हे ठिकाण जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवू शकते. स्थानिक तरुणांसाठी पर्यटन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देऊन रोजगारनिर्मितीती साधता येऊ शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 PM 07/Jun/2025














