रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने येत्या पावसाळ्यात वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महामार्ग वाहतूक पोलीस, रत्नागिरी विभागाच्या पोलीस निरीक्षक दिपाली जाधव यांनी या दोन्ही मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण केले असून, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, संरक्षक भिंतींचा अभाव आणि दिशादर्शक फलकांची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
प्रमुख धोकादायक ठिकाणे आणि आवश्यक उपाययोजना:
मुंबई-गोवा महामार्ग:
संगमेश्वर पूल व शास्त्री पूल: येथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने योग्य उपाययोजनांची गरज.
संगमेश्वर ते बावनदी: रस्त्याच्या बाजू पट्टी धोकादायक झाली असून, मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत.
बावनदी: रस्त्याचे डायव्हर्जन व सर्विस रोड अपूर्ण आहेत.
निवळी घाट: दिशादर्शक फलक, कॅटआय, बाजू पट्टीला रेडियम लावलेले नाहीत. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना व संरक्षक भिंतींची गरज आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा अपघात झाल्यास तातडीने मदत देण्यासाठी आवश्यक ती मशिनरी सुसज्ज ठेवावी.
पाली बाजारपेठ, हातखंबा गाव, लांजा शहर, कुवे: खड्डे पडलेले सेवा रस्ते पूर्ण करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांची दुरुस्ती व सुस्थिती राखणे आवश्यक आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्ग:
पाली तिठा (जंक्शन पॉईंट): दिशादर्शक फलक व बॅरिकेड नसल्याने वाहनधारक विरुद्ध बाजूने येत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी व लहान अपघात होत आहेत. तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वेरळ घाट: जोड रस्त्याचे डांबरीकरण करणे, वेग मर्यादा फलक, ब्लिंकर आणि रेडियम लावणे गरजेचे आहे.
हातखंबा गावातील दर्गा नजीक: माती रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात.
निवळी गावानजीक: महामार्गाच्या पुलाच्या एका बाजूस सेवारस्ता करणे आवश्यक आहे.
आंबा घाट (दख्खन ते गणपती मंदिर): आवश्यक उपाययोजनांची गरज.
साखरपा: येथे सेवारस्ता करणे गरजेचे आहे.
दाभोळे घाट: काम अपूर्ण असल्याने दरड कोसळण्याची शक्यता असून, दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता:
पावसाळ्यात महामार्गांवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, त्या त्या कार्यक्षेत्रानुसार आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गस्ती पथके तयार करून उपलब्ध साधनसामुग्री तयार ठेवावी. तसेच, महत्त्वाच्या ठिकाणी चालक आणि क्रेन, जेसीबी उपलब्ध करून ठेवावी, जेणेकरून एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ पोहोचता येईल आणि मदत करता येईल. त्यांचे संपर्क क्रमांक संबंधित पोलीस ठाणे तसेच वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथे कळविण्यास सांगितले आहे.
महामार्गांवरील सर्वेक्षण केलेल्या धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधित महामार्ग ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे दिपाली जाधव यांनी सांगितले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या उपाययोजना पूर्ण झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:43 04-06-2025














