अवैध वाळू उपसा थांबवणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला धमकावले; तिघांविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर, दि. ०४ जून २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे सुर्वेकॉड येथील खाडी किनारी अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याची आणि त्यांचा रस्ता अडवल्याची धक्कादायक घटना २ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली. या प्रकरणी मंडल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

सागरकुमार अनंत करंबेळे (वय ४१, रा. देवरुख, भुवड कॉलनी), जे माखजन येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, हे २ जून रोजी मिळालेल्या अवैध वाळू उपसा तक्रारीची खात्री करण्यासाठी करजुवे सुर्वेकॉड येथील खाडी किनारी गेले होते. त्यावेळी त्यांना तिथे अवैध वाळू उपसा करण्यासाठी बसवलेला सक्शन पंप दिसला. हा पंप जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करत असताना, आरोपी संदेश शरद सुर्वे (रा. करजुवे) याने फिर्यादी सागरकुमार करंबेळे, ग्राम महसूल अधिकारी कुंडलिक शेंडगे आणि जेसीबी ऑपरेटर यांना शासकीय काम करण्यापासून रोखत शिवीगाळ केली आणि धमकी दिली.

या घटनेनंतर सागरकुमार करंबेळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दि. ०३ जून २०२५ रोजी पहाटे २:२५ वाजता भा.न्या.सं. अधिनियम २०२३ च्या कलम १३२, १२६(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 04-06-2025