गणपतीपुळे : तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा ठेवण्याची कामगिरी सध्या दोन जीवरक्षकांवर येऊन ठेपली आहे, तर उर्वरित चार जीवरक्षकांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने कोल्हटकर तिठ्यातील मुख्य मार्गावर वाहतूक नियंत्रण कामासाठी ठेवले आहे. त्यामुळे सध्या जीवरक्षक समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी की वाहतूक नियंत्रण कामासाठी ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून एकूण ६ जीवरक्षक कार्यरत ठेवण्यात आले आहेत. मात्र या ६ जीवरक्षकांना गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नियक्त केलेले असताना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने यंदाच्या पावसाळी हंगामात केवळ दोन जीवरक्षकांना समुद्रकिनाऱ्यावर तैनात ठेवले आहे तर उर्वरित चार जीवरक्षकांना गणपतीपुळे कोलटकर तिठ्यातील मुख्य मार्गावर वाहतूक नियंत्रणाच्या कामाची ड्युटी लावली जात आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर सध्या दोन शिफ्ट मध्ये जीव रक्षक ठेवले आहेत. त्यामध्ये एकाला सकाळी तर दुसऱ्याला दुपार सत्रात काम करावे लागते. त्यामुळे संपूर्ण किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांना सूचना देणे आणि खोल पाण्यात गेलेल्या पर्यटकांना पाण्याबाहेर काढणे हे काम एका जीवरक्षकाला शक्य होत नाही. त्यासाठी किमान दोन दोन जीवरक्षक दोन शिफ्ट मध्ये असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सकाळ आणि दुपार सत्रात प्रत्येकी १ जीवरक्षक असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित जीवरक्षकांवर मोठा भार येऊन ठेपला आहे.
त्यातच समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना सूचना देताना आणि पाण्या बाहेर काढताना काही पर्यटक काही जीवरक्षकांचे म्हणणे ऐकून घेतात तर काही वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर दोन शिफ्ट मध्ये प्रत्येकी दोन जीवरक्षक असणे गरजेचे आहे मात्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर दोन शिफ्ट मध्ये प्रत्येकी एक जीवरक्षक ठेवून उर्वरित ४ जीव रक्षकांना वाहतूक नियंत्रणाच्या कामासाठी ठेवले आहे.
त्यामुळे सध्या जीवरक्षकांमधूनच तीव्र नाराजी आहे. त्यातच विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण कामासाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जीवरक्षक टी-शर्ट असलेल्या पोशाखात वाहतूक नियंत्रण कामासाठी ठेवल्याने जीवरक्षक नेमके समुद्र किनाऱ्यावरील कामासाठी की समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेसाठी ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकच जीवरक्षक घालतोय किनाऱ्यावर गस्त…
यंदा उन्हाळी पर्यटन हंगामात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने येथील समुद्रकिनारा प्रचंड खवळला आहे. सध्या समुद्राच्या लाटांचे पाणी थेट समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण भिंतीच्या पायऱ्यांपर्यंत येऊन धडकत आहे. त्यामुळे खोल समुद्रात आंघोळीसाठी उतरणाऱ्या पर्यटकांना समुद्राबाहेर काढण्यासाठी आणि धोक्याच्या सूचना देण्यासाठी केवळ एकाच जीवरक्षकाला विशेष नजर ठेवून संपूर्ण किनाऱ्यावर मोठी गस्त घालावी लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 04/Jun/2025














