Breaking: अणस्कुरा घाटात दीडशे फूट खोल दरीत कार कोसळली; तरुणाचा मृत्यू

राजापूर : कोल्हापूरला राजापूरशी जोडणाऱ्या अणूस्कुरा घाटात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. येथील ४०० फूट खोल दरीत एक कार कोसळून लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचे इंजिन घाटातील रस्त्यावर येऊन पडले, तर कौस्तुभचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला. कारचे अक्षरशः तुकडे झाले असून, ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेल्या सविस्तर वृत्तानुसार, कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून ३ जून रोजी कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येत होता. रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.

अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.

हा अपघात आज सकाळी उघडकीस आला. काल, ३ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अणूस्कुरा घाटात जयेश फटकारे या तरुणाला रस्त्यावर एका गाडीचे इंजिन पडलेले दिसले होते. त्यावेळी घाटात धुकं असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, आज बुधवारी सकाळी त्याला तेच इंजिन आणि गाडीचे इतर पार्ट पुन्हा दिसले. यानंतर त्याने तात्काळ अणूस्कुरा घाटातील चेकपोस्टवरील पोलीस कॉन्स्टेबल सचिन वीर यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन अणूस्कुरा घाटात तपास सुरू केला. यावेळी त्यांना रस्त्याच्या सुमारे दीडशे फूट खाली कौस्तुभ विजय कुरूप याचा मृतदेह विच्छिन्न अवस्थेत आढळला, तर गाडीचे पार्ट सुमारे ४०० फूट खोलवर विखुरलेले दिसले.

या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि राजापूर पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 04/Jun/2025