राजापूर, दि. ०४ जून २०२५: राजापूर तालुक्यातील ओझर येथील साबळेवाडी येथे एका किरकोळ वादातून एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला दगडाने मारहाण केल्याची घटना ३ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
द्रौपदी पांडुरंग साबळे (वय ७७, रा. भांडुप, सध्या रा. ओझर, साबळेवाडी, ता. राजापूर) यांच्या तक्रारीनुसार, ३ जून रोजी दुपारी त्यांचा मुलगा जितेंद्र याने आरोपी महिलेला “आमच्या घरासमोर गावकर शाम साबळे यांना ६ हजार रुपये दिले का नाहीस?” अशी विचारणा केली. यावरून आरोपी महिलेने जितेंद्रसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि आरोपी महिला जितेंद्रच्या अंगावर धावून गेली. तिने जितेंद्रला शिवीगाळ करत त्याच्या कानशिलात मारले आणि त्याला धक्काबुक्की केली. आपल्या मुलाला सोडवण्यासाठी द्रौपदी साबळे पुढे सरसावल्या असता, आरोपी महिलेने अंगणात पडलेला एक दगड उचलला आणि तो द्रौपदी साबळे यांच्या डोक्यात फेकून मारला. या हल्ल्यात द्रौपदी साबळे यांना दुखापत झाली आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
या घटनेनंतर द्रौपदी पांडुरंग साबळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दि. ०३ जून २०२५ रोजी रात्री ७:३९ वाजता आरोपी महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), १३१, ३५२, ११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे साबळेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 04-06-2025














