रत्नागिरीत हॉटेल ओम साईसमोर तरुणाला बेदम मारहाण; डोक्यात कड्याने वार, जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी, दि. ०४ जून २०२५ : रत्नागिरी एमआयडीसी, मिरजोळे येथील हॉटेल ओम साईसमोर ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता रुपनारायण हनुमान सहाय यादव (रा. जांभळफाटा, मजगाव रोड, रत्नागिरी) या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात कड्याने वार करण्यात आला असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

रुपनारायण हनुमान सहाय यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल ओम साई, एमआयडीसी, मिरजोळे येथे होते. त्यावेळी आरोपी गोठ्या नाचणकर (रा. साईभमीनगर, नाचणकर चाळ, रत्नागिरी) आणि मोबाईलवरून फोन केलेला एक अनोळखी इसम व त्याच्यासोबत असलेले अन्य दोन अनोळखी इसम असे चौघे जण तिथे आले.

या चौघांनी मिळून रुपनारायण यादव यांना हाताने थापडा मारण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना, आरोपी गोठ्या नाचणकर याच्या हातातील कडा रुपनारायण यांच्या डोक्याला लागून त्यांना दुखापत झाली. मारहाण केल्यानंतर आरोपी गोठ्या नाचणकर याने रुपनारायण यादव यांना शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या घटनेनंतर रुपनारायण हनुमान सहाय यादव यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, दि. ०३ जून २०२५ रोजी रात्री १०:५९ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 04-06-2025